पिंपरी-चिंचवड, १३ मे : भाजपच्या संघटनात्मक पुनर्रचनेनंतर राज्यभरात अनेक जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. या नियुक्त्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांची वर्णी लागली असून त्यांनी इतर इच्छुकांना मागे टाकत बाजी मारली आहे.
या पदासाठी अनेक दिग्गज इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी काटे यांच्या संघटन कौशल्यावर आणि जनसंपर्कावर विश्वास दाखवत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. काटे यांचा भाजपमधील प्रदीर्घ अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेला सखोल संवाद आणि शहरातील विविध सामाजिक-राजकीय घडामोडींमधील सक्रिय सहभाग या बाबी त्यांच्या निवडीस कारणीभूत ठरल्या, असे मानले जात आहे.
- भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने जाहीर केलेल्या अन्य महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये:
पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घाटे हे पुणेतील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक असून, त्यांनी पक्षाच्या विविध आंदोलने आणि विकास विषयक कामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
पुणे उत्तर (मावळ) जिल्हाध्यक्षपदी प्रदीप कंद यांची निवड करण्यात आली आहे. मावळ भागातील ग्रामीण आणि शहरी मतदारसंघांमध्ये भाजपचा विस्तार करण्यासाठी कंद यांच्याकडे महत्त्वाची भूमिका असणार आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनात्मक ताकदीत बळकटी येईल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त केला जात आहे.




