पिंपरी : वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला पाच दिवस उलटले असले तरी, या प्रकरणात अजूनही पुण्यातील मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांना अटक झालेली नाही, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. राजेंद्र हगवणे यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळेच त्यांना अटक होत नाहीये का, अशी चर्चा सध्या शहर परिसरात सुरू आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या मोठ्या सुनेनेही नोव्हेंबर २०२४ मध्ये अशाच छळाला कंटाळून पौड पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र हगवणे यांच्यासह सासू, दिर आणि नंदेविरोधात गुन्हा दाखल केला होता, परंतु त्यावेळी राजकीय दबावामुळे कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे.
वैष्णवीने १६ मे २०२५ रोजी आत्महत्या केल्यानंतर, तिचा पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आली आहे, पण सासरे राजेंद्र आणि दिर सुशील अजूनही फरार आहेत. दरम्यान, वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये अनेक गंभीर गोष्टी सांगितल्या आहेत. विशेषतः, तिच्या पतीने तिच्या माहेरच्या ‘आख्या खानदानाचा काटाच काढतो’ अशी धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दोन कोटींच्या मागणीसाठी छळ :
त्यानंतर साधारण १५ दिवसांनी तिचा पती शशांक याने वैष्णवीच्या माहेरी जमीन खरेदी करण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्याने, जावई शशांक याने घरी जाऊन वैष्णवीला, “तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय, मी तुला काय फुकट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या आख्या खानदानाचा काटाच काढतो,” असे म्हणत धमकी दिली होती. याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी घेतल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. एवढेच नाही तर, सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न लावून दिले, अशी माहितीही एफआयआरमधून समोर आली आहे. लग्नानंतर साधारण चार-पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली. ती दिली नाहीत म्हणून राग मनात धरून सासू लता, नणंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांनी वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास देणे सुरू केले, तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार भांडणे करत असल्याचेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासातून सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे.