छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) मोठी चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीदरम्यान, सकाळी 11 वाजेपर्यंत सुरक्षा दलांनी 26 नक्षलवाद्यांना ठार मारलंय. तर या कारवाईत एक जवान शहीद झाला असल्याचे ही सांगितलं जातंय. अबुझमद परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या कारवाई बाबत अधिक माहिती देतांना नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार म्हणाले की, जिल्ह्यातील अबुझमद भागातील माड विभागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक (DRG) नारायणपूर, DRG दंतेवाडा, DRG विजापूर आणि DRG कोंडागाव यांचे संयुक्त पथकाने ही कारवाई करत नक्षलवाद्यांच्या तळावर मोठी कारवाई सुरू केली आहे. सध्या या परिसरात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. किंबहुना नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
एक कोटीचे बक्षीस असलेला बसव राजूही मारला गेल्याची माहिती
दरम्यान, या कारवाईत माओवाद्यांच्या माड विभागाच्या एका मोठ्या केडरची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरजी नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव यांनी अबुझहमदमध्ये ऑपरेशन राबवलं. दरम्यान, सकाळपासून नक्षलवादी आणि डीआरजी संयुक्त दलांमध्ये चकमक सुरू आहे. अशातच नक्षलवादी संघटनेचा जनरल सेक्रेटरी बसव राजूही यात मारला गेल्याची माहिती समोर आली आहे. बसव राजू या माओवाद्यांवर तब्बल एक कोटीचे बक्षीस होतं. तसेच त्याने अनेक घातपाताच्या कारवायांमध्येही सक्रिय होता. अबूझमाडच्या जंगलात छत्तीसगडच्या डीआरजी आणि जवानांमध्ये अद्याप चकमक सुरू आहे. मात्र या नक्षलविरोधी अभियानाला आता मोठे यश येत असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे मृतक नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची ही शक्यता आहे.
नक्षलवाद्यांच्या मुळावर अखेरचा घाला
केंद्र सरकारने देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत दिली आहे. हे लक्षात घेता, नक्षलवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे. अलीकडेच, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टालूच्या डोंगरात नक्षलवाद्यांवर 21 दिवस कारवाई करण्यात आली. 14 मे पर्यंत सुरू असलेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी सांगितले की या कारवाईमुळे माओवादी संघटनेचे मोठे नुकसान झाले आणि वेगवेगळ्या चकमकीत 31 नक्षलवादी मारले गेले. तसेच, नक्षलवाद्यांचे 150 हून अधिक बंकर उद्ध्वस्त करण्यात आले. याशिवाय, स्वदेशी शस्त्रे बनवणारा एक कारखानाही पाडण्यात आला. येथून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली.