
- भर पावसात खांबामधील केबल होतेय स्पार्क; नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : हवामान खात्याच्या अंदाजानूसार मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे. त्यात अवकाळी पावसालादेखील सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात नागरिकांनी महापालिकेच्या पथदिवे लावलेल्या खांबांपासून खबरदारी घ्यावी लागत आहे. अनेक खांबामधील केबल स्पार्क होवू लागल्या असून काही ठिकाणी पाण्यात विद्युत पुरवठा जाऊन अपघात होवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. परंतू, याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेसाठी दिवाबत्ती यंत्रणा महापालिकेकडून उभारली जाते. महापालिका विद्युत विभागाकडून दिवाबत्ती, प्रकाश व्यवस्थेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम आवश्यकतेनुसार करण्यात येते. मात्र, अवकाळी पावसाळा सुरु झाल्याने पथदिव्यांच्या खांबामधील केबल स्पार्क होवू लागल्या आहेत. तर शहरातील सर्व खांबांची तपासणी केलेली नसल्याने त्यामुळे खांबाला स्पर्श केल्यास शॉक लागण्याचे प्रकार वाढले आहेत. विविध ठिकाणी गंजलेले व धोकादायक खांब, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर दिसून येत आहेत.
मॉन्सूनपूर्व वादळी पाऊस, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमध्ये शॉर्टसर्किट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे.वादळी पावसामुळे विजेच्या तारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, विद्युत यंत्रणाजवळील इतर ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते.
पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे व सतर्क राहणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षितेसाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील इमारती, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरीता दिवाबत्तीची यंत्रणा उभारणेत आलेली आहे. दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पिंपरी-चिंचवड पालिकेकडून करण्यात आलेले नाही.
शहरातील सर्व विद्युत अभियंत्यामार्फत नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी सर्व खांबांची तपासणी केलेली नाही. बहुतांश खांब धोकादायक अवस्थेत आधारे आढळून आले आहेत. काही खांबांची अवस्था एवढी बिकट झाली आहे की, विजेचा शॉक लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामध्ये काही उणीवा, त्रुटी असल्याचे दिसत आहे. शहरातील पोलला शॉक लागणे, गंजलेला आणि धोकादायक खांब, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर यामुळे नागरिकांनी विजेचा अपघात घडल्यास कोण जबाबदार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. इमारती व दिवा बत्तीचे खांबासाठी मनपाकडुन प्रकाश व्यवस्थेकरीता थ्री फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी लागणार आहे. याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.