मुंबई : मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुतेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीलाही पावसाने झोडपून काढले आहे. तथापि, सध्या कोसळणारा पाऊस अवकाळी आहे. २५ ते २७ जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर, तो खालच्या कोकणात आपले आगमन करेल आणि १ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल.
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंद राहणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मत्स्यव्यवसाय विभागाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक बोटींना समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे.
दरम्यान, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना आदेश लागू राहणार आहेत. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे.