पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे आकुर्डी, चिंचवड, गुरुद्वारा येथील भुयारी मार्गासह शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. निगडी, माेशी, संत तुकारामनगर, चिखली परिसर, सांगवी फाटा, भाेसरी एमआयडीसी, पिंपरी, चिंचवडमधील रस्ते जलमय झाले हाेते. सांगवी परिसरात काही घरात पाणी शिरले, तर साचलेल्या पाण्यातून वाहनचालक, नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागली.

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर संततधार होती. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका बाजूने महामेट्राे आणि दुसऱ्या बाजूने अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. या कामामुळे ठिकठिकाणी खाेदाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर माेठे खड्डे पडले. निगडीतील टिळक चाैक ते बजाज ऑटाेपर्यंतच्या मार्गावर पाणी साचले होते. या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले हाेते. यातून वाहन चालविताना चालकांना माेठी कसरत करावी लागली. यामुळे वाहतूक संथ हाेऊन काेंडी झाली.

सांगवी फाट्यावरील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरवकडे जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. पाणी साचल्यामुळे हा मार्ग तात्पुरता बंद करावा लागला. भोसरी गावठाणासह शहरातील विविध सखल भागांमध्ये तळीसदृश स्थिती झाली. सांगवीतील पवारनगर येथे घरांत पाणी शिरले. आकुर्डीतील गंगानगर येथे एक झाड काेसळले.