
पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा महिलांचा हुंड्यासाठी सुरू असलेल्या छळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे.
वैष्णवीच्या वडिलांचा आरोप काय?
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. “हगवणेंनी वैष्णवीचं दोनदा लग्न मोडलं, हगवणे कुटुंबात मला माझ्या मुलीचं लग्न नाईलाजानं करावं लागलं. दोनदा लग्न का मोडलं? काय घडलं होतं त्याबाबत मला फार काही बोलता येणार नाही कारण प्रकरण न्यायलयात आहे. हळूहळू गोष्टी समोर येतील. हुंड्यासाठी छळ केला नाही, गाडी मागितली नाही असं आता हगवणे कुटुंबाकडून सांगितलं जातं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, वैष्णवीच्या लग्नात मी एमजी हॅक्टर गाडी बुक केली होती. ती मी रद्द केली कारण त्यांनी वाद घालून फॉर्च्युनर मागून घेतली. असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला.
बैठकीत वादावादी झाली होती फॉर्च्युनरच हवी असा हट्ट धरला होता. त्यांच्याकडे ही एकच कार आहे. जी काही ९० लाखांची गाडी आहे सांगत आहेत ती चंद्रकांत हुचडे नावाने आहे. हगवणे कुटुंबाकडे कुठलीही गाडी नाही. माझ्याकडे कार मागितली, लग्नाला उभं राहणार नाही, लग्नातून निघून जाईन अशा धमक्या देऊन माझ्याकडून सगळा हुंडा घेतला आहे. अधिक महिन्यात जावयाला चांदीचं ताटच पाहिजे असाही हट्ट धरला होता तो पण मी पूर्ण केला.” असंही अनिल कस्पटे म्हणाले.




