
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रुजण्यासाठी महापालिका आणि चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ मे २०२५ या काळात ‘पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ९० चित्रपट, लघुपट, माहितीपट, ॲनिमेशनपट मोफत पाहण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे. आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह आणि चिंचवड, संभाजीनगर येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्रात सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत चित्रपट दाखविले जाणार आहेत.
या महोत्सवात ३९ देशांतील निवडक चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व समीक्षकांची उपस्थिती असणार आहे. मराठी चित्रपटावर, तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांवर आधारित चर्चासत्रही होणार आहे. नवोदित चित्रपटकार व विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील व्यासपीठ असणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व विविध परदेशी भाषांतील चित्रपट महोत्सवात दाखविले जाणार आहेत. ‘पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ चे व्यवस्थापन मुंबा फिल्म फाउंडेशन करीत आहे. पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे या महोत्सवासाठी सहकार्य आहे.




