“पाऊस थांबूनही ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर, आकुर्डीतील नागरिक त्रस्त – महापालिका गप्पच!”
पिंपरी-चिंचवड : शहरात पाऊस थांबून तब्बल तीन दिवस झाले असतानाही आकुर्डी येथील आकुर्डी थरमॅक्स चौक रोडवरील ड्रेनेज समस्या कायम असून, बजाज कंपनीच्या भिंतीलगत रस्त्यावर आजही ड्रेनेजचे पाणी संत वाहताना दिसत आहे. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल सुरूच आहेत.
ड्रेनेजचे साचलेले व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मध्यभागातून प्रवास करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हा भाग ‘अ’ प्रभाग हद्दीत येतो. मात्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे कानाडोळा केला असून, गेल्या आठवड्याभरापासून ही स्थिती आहे.
“महापालिकेचे अधिकारी या रस्त्यावरून जात नाहीत का? त्यांना रस्त्यावर वाहणारे पाणी दिसत नाही का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. तत्काल उपाययोजना न झाल्यास नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने तात्काळ लक्ष घालून नागरिकांच्या या त्रासदायक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.




