बंगळुरू : आरसीबीच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास १५ जण जखमी झाले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान दोघांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींची संख्या १५ झाली आहे आणि ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना बोरिंग हॉस्पिटल आणि वैदेही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

१८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. आरसीबीच्या विजयानंतर संपूर्ण जगभरातील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना दिसला. यादरम्यान बंगळुरूमध्ये संघ या विजयाचा चाहत्यांबरोबर आनंद साजरा करण्यासाठी पोहोचला आहे. संघ प्रथम विधान सौधा येथे पोहोचला, जिथे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात आला.