- त्रिवेणीनगर–तळवडे रस्त्याची २४ मीटर रुंदी कायम ठेवावी
- धार्मिक भावना आणि स्थानिक नागरिकांचा विचार करून घारजाई माता मंदीराजवळ जोडला जाणारा 24 मीटर रस्ता यापुर्वीच्या विकास आराखड्याप्रमाणे आहे त्या ठिकाणीच कायम करावा
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात त्रिवेणीनगर–तळवडे आणि रुपीनगर येथील घारजाई माता मंदिर परिसरातील रस्त्याच्या रुंदीमध्ये प्रस्तावित बदल रद्द करून पूर्वीप्रमाणे २४ मीटर रुंदीचाच रस्ता कायम ठेवावा आणि धार्मिक भावना आणि स्थानिक नागरिकांचा विचार करून रुपीनगरला घारजाई माता मंदीराजवळ जोडला जाणारा 24 मीटर रस्ता यापुर्वीच्या विकास आराखड्याप्रमाणे आहे त्या ठिकाणीच कायम करण्याची मागणी माजी नगरसेवक पंकज दत्तात्रय भालेकर यांनी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
गाव मौजे तळवडे येथील विकास आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने ६० दिवसांच्या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक भालेकर यांनी स्थानिक शेतकरी व रहिवाशांच्या वतीने आपली भूमिका मांडत ही मागणी केली आहे.
भालेकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, त्रिवेणीनगर–तळवडे रस्त्याची रुंदी २४ मीटर असून, त्यासाठीची संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया शासनाने यापूर्वीच पूर्ण केली आहे. सदर रस्ता १५ वर्षांपूर्वी तयार झालेला असून, नव्या आराखड्यात त्याची रुंदी ३० मीटर दर्शविण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे हा बदल तातडीने रद्द करून रस्ता पूर्ववत २४ मीटर रुंद ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, रुपीनगरमधील घारजाई माता मंदिर परिसरातील जुन्या रस्त्याची दिशा काही अंतराने उत्तरेकडे स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे सध्याचे बांधकामे आणि धार्मिक स्थळ बाधित होण्याचा धोका आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे स्थानिक नागरिक बेघर होण्याची शक्यता असून, धार्मिक भावना दुखावण्याची भीती आहे. रस्ता पहिल्या असल्याप्रमाणेच ठेवण्यात यावा आणि घारजाई माता मंदिर परिसरातील श्रद्धास्थान वाचवले जावे, अशी मागणी आम्ही नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन करत आहोत,” असे भालेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.




