पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही वेळातच अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. कामावर जाण्याच्या वेळेस सुरू झालेल्या जोरदार सरींमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, दुचाकीस्वारांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
विशेषतः पुनावळे, ताथवडे, वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे सौदागर, विशाल नगर, चिंचवड, पिंपरी, मोहननगर, काळभोर नगर, कुदळवाडी, जाधववाडी आणि चिखली या भागांमध्ये सखल भागांमध्ये आणि पुलाखाली पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. परिणामी काही भागांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांची अवस्था जलाशयासारखी झाली होती. काही भागांमध्ये वाहनं बंद पडल्याचेही निदर्शनास आले आहे.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काही ठिकाणी पाणी उपसण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र पावसाचा जोर न थांबल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गैर गरजेचे प्रवास टाळावा, तसेच जलसाचलेल्या भागांमध्ये वाहन चालवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




