वॉटरपार्क नव्हे, आयटीपार्क..! हिंजवडीत अवघ्या १० मिनिटांत पावसाचा कहर; रस्ते जलमय
हिंजवडी : शनिवारी सकाळी पडलेल्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात अक्षरशः हाहाकार उडाला. अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या पावसात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी हिंजवडीतील मुख्य रस्त्यावरती असणारे मेट्रोच्या पुलाखाली संपूर्ण परिसर जलमय झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.

पावसाचे पाणी साचल्यामुळे आयटी पार्क परिसराचा ‘वॉटरपार्क’ झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की दुचाकी वाहने अक्षरशः पाण्यात वाहून गेली. पीएमपीएल बस वाहतूक करताना पन्नास टक्के पाण्यात बुडाल्याचेही चित्र समोर आले. चारचाकी वाहनांचेही प्रचंड हाल झाले. अनेक वाहनचालकांना पाण्यात अडकलेल्या गाड्या ढकलत बाहेर काढावे लागले.
या घटनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी यामुळे आपल्या ऑफिसला पोहोचण्यात अडचणींचा सामना केला.
प्रशासनाच्या अपुऱ्या तयारीवर संताप
प्रत्येक वर्षी येणाऱ्या पावसामुळे हीच स्थिती ओढवते, तरीही पावसाआधीच पुरेशा उपाययोजना न करणाऱ्या प्रशासनावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “आयटी हब म्हणवणाऱ्या या भागात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अजूनही सक्षम यंत्रणा नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.
पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरवर्षीच्या पावसात हिंजवडीसह पिंपरी-चिंचवड परिसरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडतो. जलनिचरा व्यवस्था, ड्रेनेज साफसफाई याबाबत PMC आणि PMRDAच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.




