पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत शहरातील वृक्षांना नियमितपणे पाणी देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ९००० लिटर क्षमतेचे ८ वॉटर टँकर (प्रत्येकी दोन मजूर कर्मचाऱ्यांसह) भाडेतत्वावर घेतले जाणार असून, या कामासाठी महापालिकेकडून तीन वर्षांचा सुमारे ₹ ७.४२ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
महापालिकेने यासंदर्भात इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविल्या असून, दर देताना GST वगळून दर द्यावेत, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. GST स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे, अशी माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली. ही निविदा 19 जून रोजी उघडण्यात येणार आहे. ही निविदा कोणाला मिळणार यासाठी भोसरी येथील एका मोठ्या राजकीय नेत्याचा भावाची सेटलमेंट झालेली आहे अशी दबक्या आवाजात चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
या निविदेअंतर्गत ठेकेदारांनी ८ टँकरसह प्रत्येक टँकरवर दोन मजूर कर्मचारी पुरवणे अनिवार्य असून, झाडांना नियमानुसार पाणी देण्याची जबाबदारी त्यांची असेल. ही सेवा तीन वर्षांकरिता राबविण्यात येणार असून, एकूण खर्च ₹७,४२,००,००० एवढा अपेक्षित आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक पाऊल उचलल्याचे चित्र आहे. मात्र एवढ्या मोठ्या निधीचा खर्च व त्यातील पारदर्शकता याबाबत करदात्या नागरिकांमध्ये चर्चा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.




