तळेगाव दाभाडे | रविवार, १५ जून २०२५
पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने मावळ तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळी सुरक्षेच्या कारणास्तव बंदी लागू केली असतानाही, रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी कुंडमळा (घोराडेश्वरजवळ) येथे पाहायला मिळाली. याच दरम्यान, पवना नदीवर असलेला जुना लोखंडी पूल गर्दीच्या भारामुळे कोसळला असून, अनेक पर्यटक नदीत वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्थानिक प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत दोन पर्यटकांचे मृतदेह सापडले असून इतर काहीजण अद्याप बेपत्ता आहेत. बचाव आणि शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
या पुलाचा वापर दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात होता. मात्र पूल पूर्णपणे जीर्णावस्थेत असल्याने त्याचा वापर धोकादायक ठरू शकतो, असा इशारा पूर्वी दिला गेला होता. आज रविवार असल्याने पर्यटकांची संख्या अधिक होती. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पुलावर मोठ्या संख्येने लोक होते आणि त्याच क्षणी पूल कोसळला.

मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात – भुशी डॅम, सहारा पूल, लाईन्स पॉईंट यासह अनेक पर्यटन क्षेत्र परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या धबधब्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यानंतर काही पर्यटकांनी पर्याय म्हणून कुंडमळा परिसर गाठला होता.
पुलाच्या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक बचाव पथक कार्यरत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, हवामान आणि सुरक्षा लक्षात घेऊन अनधिकृत आणि धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी जाणे टाळावे.
मिळालेल्या माहितीनुसार ओंकार विष्णू पेहेरे, वय २३, शुभम कैलास वाळुंजकर, वय २४, श्रीकांत ज्ञानेश्वर गरड, वय २३ ही नेवासा जि.अहमदनगर येथील मुले पर्यटन करणेसाठी कुंडमळा येथे गेली होती. त्यांनी सांगितले की दु. ३.१५ वा. सुमारास पुल कोसळला आम्ही खाली पडून जखमी झालो. आम्हास तेथील नागरिकांनी अॕडमीट केले.
सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात 6
अथर्व रुग्णालयांमध्ये 18 जखमीवर उपचार सुरू असल्याची ही माहिती मिळत आहे.




