पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर (संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम स्थळ) परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले. या कार्यवाहीमुळे गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आलेल्या वारकरी भक्तांना दिलासा मिळाला आहे.
शतकानुशतके संत तुकाराम महाराज पालखी ही 340 वर्षांहून अधिक काळापासून अखंडपणे आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिर येथे मुक्काम करत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मंदिर परिसर आणि पालखी तळावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे लाखो वारकरी व भाविकांची गैरसोय होत होती. परिणामी पालखी मुक्काम दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रस्ताव देखील वेळोवेळी पुढे येत होता.
मंदिराजवळ असलेल्या भाजी मंडई परिसरात गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, होळी, गुढीपाडवा आणि स्थानिक यात्रा अशा अनेक सण-उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे अतिक्रमणामुळे सार्वजनिक शिस्त व भाविकांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होत होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन मा. आयुक्तांनी पंधरा दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पालखी तळाची पाहणी केली आणि तात्काळ अतिक्रमण हटवण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. या आदेशांची अंमलबजावणी करत आज पालखी तळ आणि मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमण हटवण्यात आले.
ही कारवाई वारकऱ्यांच्या श्रद्धेचा सन्मान राखणारी असून, संत परंपरेचा सन्मान कायम राखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरते आहे. पालखी मुक्कामाची ऐतिहासिक परंपरा अबाधित राहावी, यासाठी पालिकेचा हा निर्णय स्वागतार्ह मानला जात आहे.




