पिंपरी : काळेवाडी परिसरातील स्व. अंकुशभाऊ कोकणे प्रतिष्ठान यांच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १६ जून २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मा. नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी स्व. अंकुशभाऊ कोकणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उद्घाटनप्रसंगी नाना काटे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची स्तुती करत, सामाजिक कार्यात सातत्य ठेवणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेवक संतोष अंकुशभाऊ कोकणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. शिबिरादरम्यान अनेक नागरिकांनी रक्तदानात सहभाग घेतला, तसेच मोफत आरोग्य तपासणीसाठी उत्स्फूर्त गर्दी झाली.
यावेळी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंतभाऊ गावडे, नगरसेवक विनोद नढे, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीताताई कोकणे, दिलीप आप्पा काळे, तसेच संतोष माचुत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत स्व. अंकुशभाऊ कोकणे प्रतिष्ठान ने आरोग्य क्षेत्रात मोलाची सेवा दिली असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.