गुजरात : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यानंतर काही वेळातच या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये विमान नागरी वस्तीच्या अगदी जवळून गेल्याचे आणि काही वेळात कोसळल्याचे स्पष्ट दिसत होते. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याने विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी काय साधली? याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता सदर व्हिडीओ चित्रीत करणारा युवक समोर आला असून पोलिसांनी त्याला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची विचारपूस करून सोडून देण्यात आले आहे.
व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या युवकाचे नाव आर्यन असून तो नुकताच गावावरून आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. आर्यनने सहज रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे संबंध जगासमोर एअर इंडियाच्या भीषण अपघाताच दृश्य जगासमोर आले. त्यानंतर विमानतळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यही समोर आले होते. मात्र आर्यनच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ अगदी जवळून काढल्याचे दिसत होते. यामुळे सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या कारणाचा तपास घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते.
द लल्लनटॉप या यूट्यूब वाहिनीला आर्यनने मुलाखत दिली असून व्हिडीओ कसा रेकॉर्ड केला याची माहिती दिली. आर्यन हा मुळचा अहमदाबादमधील रहिवासी नाही. तो गावावरून नातेवाईकांच्या घरी आला होता. केवळ उत्सुकतेपोटी आर्यन व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. विमान जवळून जात असल्याचे व्हिडीओ गावातील मित्रांना दाखवायचे होते, त्यामुळे आपण रेकॉर्ड करत होतो, असे त्याने सांगितले.