पिंपरी : भोसरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक अजित गव्हाणे आणि ३५ हून अधिक आजी माजी नगरसेवक तसेच विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं अहमदाबाद विमान दुर्घटना आणि कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
राजकीय जीवनात काम करत असताना ठराविक दृष्टिकोन ठेवून पुढे चालायचं असतं. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या सर्वधर्मसमभावच्या विचारांवरतीच पुढे चालून आपला महाराष्ट्र आणि देश पुढे जाणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं, त्यांच्या विचारांचं देखील अनुकरण करून आम्ही सगळे पुढे चालत आहोत. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी घ्यायची असते, ती भूमिका मी पार पाडत आलो.
पावसानं महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतपिकांचं नुकसान केलं असून शेतकरी बांधवांना पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी आपलं सरकार कार्यतत्पर आहे. भोसरी तसंच पिंपरी चिंचवडमधील अनेक विकासकामं पूर्णत्वास नेणं शिल्लक असून त्यांसंबंधित ऊहापोह होणं गरजेचं आहे. वंचितांना, दुर्बलांना सोबत घेऊन पुढे चालायचं आहे, अशी शिकवण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या घटकांना संधी मिळणार आहे. माझ्या भगिनींना देखील संधी उपलब्ध होणार. ओबीसी घटक सुद्धा फार मोठा असून त्या घटकातील लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार आहे.
सामाजिक कार्यातूनच कार्यकर्ता जन्माला येतो, तो कार्यकर्ता आपल्याला शोधता येतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी कामाला लागावं, प्रभागांमध्ये आपापला संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, पक्ष सभासद नोंदणी आणि पक्ष वाढीसाठी कामाला लागावं, अशा सूचना केल्या.
अजित पवारांनी आपल्या भाषणात पुढील मुद्द्यांचा उल्लेख केला
- सामाजिक समरसतेवर भर: शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालूनच महाराष्ट्राचा विकास होईल.
- शेतकऱ्यांसाठी आश्वासन: पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध आहे.
- विकासकामांची प्रगती: भोसरी व पिंपरी-चिंचवडमध्ये प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा होणे आवश्यक.
- स्थानिक निवडणुकांची तयारी: वंचित, महिलां, ओबीसी समाजाला संधी देण्याचे आश्वासन.
- संगठन मजबूत करण्याचा आग्रह: प्रभाग पातळीवर संपर्क वाढवणं, सदस्य नोंदणी आणि पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन.




