पिंपरी-चिंचवड, १७ जून — आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा बळकटीचा आधार मिळाला. या मेळाव्यात भोसरी परिसरातील ३५ हून अधिक माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्ष सोडून गेलेले काही माजी पदाधिकारी पुन्हा राष्ट्रवादीच्या घरी परत येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले माजी महापौर संजोग वाघेरे पाटील हे देखील परतीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. वाघेरे पाटील यांनी आज पुण्यात अजित पवार यांची भेट घेऊन राजकीय चर्चेला उधाण आणलं आहे.
या संदर्भात, भोसरीतील मेळाव्यादरम्यान बोलताना श्री. अजित गव्हाणे यांनी देखील संजोग वाघेरे पाटील यांच्या संभाव्य पुनरागमनाला दुजोरा दिला. त्यांनी स्पष्ट केलं की, अजितदादा हे कार्यकर्त्यांचे मन जाणणारे नेते आहेत. कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात गेला असला, तरी त्याच्या कामगिरीला मान्यता देऊन त्याला पुन्हा संधी देण्याचा मोठेपणा दादांमध्ये आहे. त्यामुळेच अनेकांना त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करायची इच्छा आहे.
संभाव्य पुनरागमनाबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी, वाघेरे पाटील यांच्या राष्ट्रवादीत पुनःप्रवेशाच्या चर्चांना आता अधिकाधिक बळकटी मिळू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून लोकसभा लढवलेले वाघेरे पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं स्थानिक राजकीय वर्तुळात बोललं जातं. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा ताकदीनं मैदानात उतरण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.




