“हेचि दान देगा देवा, तुज चरणी ठेवीन सेवा
भावे अर्पीन आत्माराम, भवसागर दे पार!”
श्री क्षेत्र देहू : जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळा आज अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दर्शन घेतले. यावेळी सोबत मावळचे आमदार सुनिल शेळके उपस्थित होते.
आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात आहे. यावेळी देहू नगरी शेकडो वारकरी, टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या जयघोषात, भक्तीरसात न्हालेली आहे. संत तुकाराम महाराजांचा गाथेतील संदेश वारकऱ्यांच्या मुखातून, त्यांच्या पदन्यासातून व्यक्त होत होता. विठोबाच्या नामस्मरणाने अवघं परिसर गाजत होता.
या पावन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार विशेष उपस्थित होते. त्यांनी पालखीच्या दर्शन घेतले आणि उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य शासनातर्फे वारी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली आणि सर्व यंत्रणांना योग्य समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.
वारी ही केवळ परंपरा नाही, तर ती माणुसकी, भक्ती आणि समतेचा महामार्ग आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. वारीमध्ये सहभागी सर्व भाविकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून, अनुशासितपणे वारी करत संतांच्या शिकवणीचा प्रसार करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




