पिंपरी-चिंचवड, १७ जून – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रशासकीय बदलांच्या चर्चांना आज अधिकृत स्वरूप मिळालं, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीचे स्पष्ट संकेत दिले. भोसरी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यात भोसरी विधानसभा मतदारसंघातील ३५ हून अधिक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे पक्षाला महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठे यश मिळाले आहे.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात शहरातील विविध विकासकामांवर भाष्य करताना, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय नेतृत्वाबाबतही भाष्य केलं. “शेखर सिंह यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी लवकरच नवीन आयुक्त राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात येईल,” असं सांगत त्यांनी आयुक्तांच्या बदलाची स्पष्ट दिशा दाखवली.
शेखर सिंह यांनी 2021 मध्ये आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता आणि त्यांच्या कार्यकाळात शहरात अनेक मोठी प्रकल्पं राबवण्यात आली. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बदल अपरिहार्य असल्याचं संकेत अजित पवारांनी आज दिला आहे. हा बदल केवळ कार्यपद्धतीत नव्हे, तर आगामी निवडणुकीच्या तयारीचा एक भाग असल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नवीन आयुक्त कोण असतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




