पिंपरी-चिंचवड, 18 जून 2025 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वडमुखवाडी, पुणे येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्मित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीच्या समूहशिल्प व संतसृष्टीचे उद्घाटन संपन्न झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले, “संतसृष्टी व ऐतिहासिक भेटीच्या समूहशिल्पाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या प्रकल्पासाठी एकूण ₹30 कोटी 69 लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. वडमुखवाडी आणि चऱ्होली (पुणे) येथील या प्रकल्पाचा उद्देश नव्या पिढीला आपल्या संस्कृतीतील वारकरी संप्रदाय व महान संतांची माहिती देणे आहे.
या परिसरात मिश्र धातूपासून तयार केलेली 25 शिल्पे उभारण्यात आली आहेत, ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आणि इतर 20 वारकरी समाविष्ट आहेत. याशिवाय, चौथरा, रिटेनिंग वॉल, स्टोन क्लॅडिंग, ओपन एअर थिएटर, विद्युत आणि बागकाम, रेलिंग व स्वच्छतागृह यांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. या परिसरात संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित 47 ब्रॉन्झ म्युरल्स उभारण्यात आले असून, त्यांच्या शेजारी माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत.
उद्घाटन प्रसंगी खा. श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, आ. अमित गोरखे, आ. उमा खापरे आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड शहराला भक्तिचे नवे दालन मिळाले असून, येथील नागरिक आणि पर्यटक संतांच्या जीवनातील प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतील.