पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली येथील स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या १.७५ हेक्टर भूखंडापैकी सुमारे ४० टक्के म्हणजेच सुमारे ७,००० चौ. मी. क्षेत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (एसटीपी) वापरण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि.२४) मान्यता दिली आहे.
इंद्रायणी नदीच्या संरक्षणासाठी चिखली परिसरात अशा चार एसटीपी प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. या प्रस्तावित एसटीपीची दररोज २० दशलक्ष लिटर (एमएलडी) प्रक्रिया क्षमता असणार आहे. याबाबत यावर्षीच्या सुरुवातीलाच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. सुधारित विकास आराखड्याच्या (डीपी) मसुद्यातही यासाठी जागा राखण्यात आली होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता डीपी च्या अंतिम मंजुरीची वाट न पाहता प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
“राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महापालिकेला तात्काळ काम सुरू करता येणार असून, त्यामुळे इंद्रायणी नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यास मदत होणार आहे. तसेच उर्वरित ६० टक्के भूखंड दफनविधीसाठी राखून ठेवण्यात येणार आहे.”
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका




