तळेगाव दाभाडे (दि. ३० जून २०२५) –
मावळ तालुक्याचे भाग्यविधाते, मावळ भूषण, शिक्षण महर्षी, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आणि मावळचे माजी आमदार मा. श्री. कृष्णराव धोंडीबा भेगडे (वय ८९) यांचे सोमवार दिनांक ३० जून २०२५ रोजी रात्री ९ वाजता अल्प आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मावळ तालुका शोकसागरात बुडाला असून, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
🕯️ अंत्ययात्रेची माहिती :
मा. भेगडे यांच्या अंत्ययात्रा मंगळवार, दिनांक १ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लेख पॅराडाईज, तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघेल. अंत्यविधी तळेगाव येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे होईल. त्यांच्यामागे कन्या राजश्री म्हस्के, जावई राजेश म्हस्के व नातवंडे असा परिवार आहे.
🏛️ राजकीय वाटचाल : पराभवातून घडवले यशाचे पर्व
1967 : अवघ्या 459 मतांनी आमदारकी हुकली
कृष्णराव भेगडे यांनी 1967 साली भारतीय जनसंघाच्या तिकिटावर मावळ विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली. त्यावेळी मावळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे रघुनाथ शंकर सातकर यांच्याशी झालेल्या थरारक लढतीत केवळ 459 मतांनी त्यांचा पराभव झाला. सातकर यांना 19,525 मते मिळाली, तर भेगडे यांना 19,066 मते मिळाली होती.
1972 : जनसंघाचा झेंडा फडकवणारे पहिले आमदार
या पराभवानंतर त्यांनी हार मानली नाही. मतदारसंघात जोमाने कार्य सुरू ठेवत भारतीय जनसंघाच्या विचारांची पाळेमुळे खोलवर रुजवली. 1972 च्या निवडणुकीत पुन्हा रघुनाथ सातकर यांच्याविरुद्धच निवडणूक लढवत त्यांनी 3636 मतांनी विजय मिळवला. मावळ विधानसभा मतदारसंघात जनसंघाचा पहिल्यांदाच विजय झाला.
1978 : काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा आमदार
पहिल्या कार्यकाळातील उल्लेखनीय कार्याच्या जोरावर त्यांनी 1978 च्या निवडणुकीतही यश मिळवले. विशेष म्हणजे या वेळी ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. भारतीय जनता पक्षाचे नथूभाई भेगडे यांचा त्यांनी 9333 मतांनी पराभव केला.
मावळ विधानसभेत दोन पक्षांतून निवडून आलेले एकमेव आमदार
सलग दोन वेळा, आणि तेही वेगवेगळ्या पक्षांतून निवडून आलेले मा. कृष्णराव भेगडे हे मावळमधील एकमेव आमदार होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहास हा लोकशाही मूल्यांची आणि मतदारसंघाशी असलेल्या निष्ठेची साक्ष देतो.
🎓 शिक्षण क्षेत्रात मौल्यवान योगदान
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे ही संस्था उभी करताना आणि तिच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करताना त्यांनी आयुष्य वेचले. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडून देणारे ते खरे शिक्षणमहर्षी होते.