एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच 150 किमी पेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी म्हणजेच सवलतधारक प्रवासी वगळून प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे.
ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे. याचा प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 1 जून रोजी एसटीच्या 77 व्या वर्धापन दिनी प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. मात्र ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. सध्याच्या सवलतधारक प्रवाशांना म्हणजे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी इत्यादींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
आषाढी एकादशीला आणि गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना लाभ
येत्या आषाढी एकादशीला आणि गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत आजपासून लागू होत आहे. मात्र जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. ST Ticket Rates |
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येईल. शिवनेरीसह साधी लालपरी, ई-शिवाई, सेमी लक्झरी या सर्व बससाठी ही सवलत लागू असेल.