चिखली (वार्ताहर) शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि एआयसीटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे दहावी व बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एआयसीटीचे संचालक प्रा. राजेश सप्रा होते. यावेळी मारुती भापकर, भास्कर रिकामे, कल्याणी भावसार, नारायण बहिरवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कल्याणचे संचालक प्रा. अमेय महाजन यांना निमंत्रित करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. अमेय महाजन म्हणाले, “मुलांचा कल ओळखून त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे करिअर निवडण्याची संधी द्यावी. पालकांनी आपल्या अपेक्षा जबरदस्तीने लादू नयेत. त्यांनी एनडीए, मिलिटरी स्कूल, मर्चंट नेव्ही, पायलट यांसारख्या क्षेत्रांतील संधींबाबत माहिती देत असेही सांगितले की, “या संधी महाराष्ट्रात उपलब्ध असूनही मराठी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व कमी आहे, ते वाढवण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केल्याने त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळते. एआयसीटीच्या कल्याणी भावसार यांनी त्यांच्या इंटिरियर डिझायनर इन्स्टिट्यूट बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांपैकी मारुती भापकर व भास्कर रिकामे यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
१० वी १२ विच्या गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान
कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन सारिका रिकामे व तेजस्विनी बडे यांनी तर आभार प्रदर्शन हरि नारायण शेळके यांनी केले.
पालक आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
या प्रेरणादायी कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दिशादर्शन मिळाले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि एआयसीटी च्या पुढाकारातून झालेला हा उपक्रम शिक्षणातील सकारात्मकतेचा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा उत्तम आदर्श ठरला.




