पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नदी सुधार प्रकल्पासाठी लागणारा निधी व पर्यावरण ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळावे, यासाठी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.
इंद्रायणीस एनओसी, पवनासाठी प्रतीक्षा
संदीप वाघेरे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, इंद्रायणी नदीस नुकतीच महाराष्ट्र राज्य पर्यावरण समितीकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्राप्त झाले असून, पवना नदीसाठी अद्यापही एनओसी मिळालेली नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पवना नदीस तातडीने पर्यावरण समितीकडून मंजुरी व केंद्र-राज्य शासनाकडून निधी मिळावा, अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे.
२०१२ पासून रखडलेला प्रकल्प
या प्रकल्पासाठी २ मे २०१२ रोजी प्राथमिक प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे (NRCD) सादर करण्यात आला होता. त्यानंतर २०१३ व २०१४ मध्ये सुधारित अहवाल सादर केला गेला. मात्र, २०१५ मध्ये एनआरसीडीने अहवाल फेरसादर करण्याची सूचना दिली, आणि प्रकल्प रखडला.
१५०० कोटींचा पवना, १२०० कोटींचा इंद्रायणी प्रकल्प
महापालिकेने एचसीपी डिझाईन प्लॅनिंग मॅनेजमेंट प्रा. लि. या सल्लागार संस्थेमार्फत दोन्ही नद्यांचे संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण केले असून, नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, अनधिकृत राडारोडा टाकून केलेल्या भरावांचा आढावा घेतला आहे.
प्रकल्पासाठी पवना नदीसाठी १५०० कोटी तर इंद्रायणी नदीसाठी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण २७०० कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून मिळणे अत्यावश्यक असल्याचे वाघेरे यांनी अधोरेखित केले.
महत्वपूर्ण पर्यावरणीय उपक्रम
“हा प्रकल्प केवळ नदी स्वच्छतेचा नव्हे, तर शहराच्या पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. गेली १२ वर्षे हा प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला असून, आता सरकारने यात गांभीर्याने लक्ष घालून हे काम मार्गी लावणे आवश्यक आहे असे संदीप वाघेरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पवना नदीस ना-हरकत दाखला मंजूर करून, प्रकल्पास तातडीने निधी वितरित करण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या उपक्रमामुळे शहरातील नद्या पूर्वस्थितीत येण्यास आणि नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरण रक्षणास मोठा हातभार लागणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाला मंजुरी आणि निधी मिळाल्यास, प्रदूषणमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी ही एक ऐतिहासिक सुरुवात ठरेल.




