पिंपळे सौदागर (प्रतिनिधी): पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात राज्यातील पहिल्या आणि एकमेव “वेस्ट टू वंडर वर्ल्ड” थीम पार्कची उभारणी काम जोरात सुरू असून, यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन महत्त्वात लक्षणीय वाढ होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली साकारत असलेले हे प्रकल्प महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरणार आहे.
या पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यांसह एकूण १७ ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, या स्मारकांच्या निर्मितीसाठी “वेस्ट टू वंडर” या संकल्पनेनुसार टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. या पार्कच्या उभारणीसाठी एकूण ११.०२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
थीम पार्कमध्ये साकारल्या जाणाऱ्या प्रमुख वास्तूंमध्ये खालील जागतिक स्मारकांचा समावेश आहे:
- ताजमहाल (भारत)
- आयफेल टॉवर (फ्रान्स)
- बुर्ज खलिफा (दुबई)
- लीनिंग टॉवर ऑफ पिसा (इटली)
- सिडनी ऑपेरा हाऊस (ऑस्ट्रेलिया)
- अजिंठा लेणी (भारत)
- ला सागराडा फॅमिलीया (स्पेन)
- चिचेन इत्झा (मेक्सिको)
- पेट्रा ऑफ जोर्डन
- कोलोसियम ऑफ रोम
- बिग बेन ऑफ लंडन
- अंगकोर वट ऑफ कंबोडिया
- हंपीचे रथ (भारत)
- स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (अमेरिका)
- ट्रेव्ही फाउंटन (इटली)
- माउंट रश्मोर (अमेरिका)
या थीम पार्कची उभारणी पूर्णत्वास गेल्यानंतर पिंपरी चिंचवडचे नाव राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून अधोरेखित होईल, यात शंका नाही. पार्कची रचना “टाकाऊ पासून टिकाऊ” या पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून करण्यात येत असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही हे एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत याबाबत सविस्तर माहिती घेतली. विरोधी पक्षनेते मा. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी कामाची पाहणी करताना नागरिकांसाठी हे थीम पार्क लवकरच खुले होईल, अशी माहिती दिली.
या भव्य प्रकल्पामुळे पिंपळे सौदागर परिसराचा कायापालट होणार असून, नागरिकांना एक वेगळीच पर्यटन अनुभूती मिळणार आहे. लवकरच हे पार्क नागरिकांच्या भेटीसाठी खुले करण्यात येणार असून, शहरातील नागरिकांमध्ये याबाबत मोठ्या उत्सुकतेचे वातावरण आहे.