चिंचवड (प्रतिनिधी) : दत्तवाडी आकुर्डी येथील सीएमएस इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी आदित्य नानासाहेब पिसाळ याचा एसएससी बोर्डाच्या निकालापूर्वीच दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. अत्यंत हुशार आणि अभ्यासू असलेल्या आदित्यला निकालात ९४.८०% गुण प्राप्त झाले. मात्र निकाल पाहण्याआधीच तो आयुष्याच्या शर्यतीतून कायमचा हरपला. त्याच्या अकाली जाण्याने प्रभाग क्रमांक १४ मध्ये शोककळा पसरली असून अनेक पालक व शिक्षकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
स्व. आदित्यच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रभागातील माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या पुढाकाराने “स्वर्गीय आदित्य नानासाहेब पिसाळ गुणवंत विद्यार्थी पुरस्कार 2025” चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा खासदार श्रीरंग बारणे आणि अजित गव्हाणे यांच्या हस्ते रोख ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. एकूण ४६० विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत पुरस्कार देण्यात आले.
या दरम्यान एक विशेष घटना घडली. प्रभागातील राज प्रदीप जगताप याला सिव्हिल सर्व्हिसेस आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती, पण घरची हलाखीची परिस्थिती अडथळा ठरत होती. त्याची आई सामाजिक कार्यकर्ते चेतन बेंद्रे यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेली. “माझा मुलगा अधिकारी व्हावा, पण आम्हाला दिशा समजत नाही,” अशी कळकळीची विनंती तिने केली.
या कुटुंबाची इच्छाशक्ती आणि मुलाचा ध्यास पाहून, बेंद्रे यांनी राज जगतापला ‘आदित्य गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय घेतला. आदित्यचे वडील नानासाहेब पिसाळ यांना सोबत घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. “राज भविष्यात अधिकारी होऊन देशाची सेवा करेल,” असा विश्वासही चेतन बेंद्रे यांनी व्यक्त केला.
तसेच बेंद्रे यांनी प्रभागातील ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या ३७० विद्यार्थ्यांना ‘आदित्य गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ घरपोच जाऊन ट्रॉफी देऊन सन्मानित केले. पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमामुळे एकीकडे स्व. आदित्य पिसाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर दुसरीकडे इतर विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी प्रेरणा मिळाली. परिसरात या सामाजिक उपक्रमामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.