वडगाव मावळ | प्रतिनिधी
मावळचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी आणि मावळ तालुक्याचे जेष्ठ नेते स्व. कृष्णराव धोंडीबा भेगडे यांच्या निधनानंतर आज मावळ येथील त्यांच्या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. त्यांनी भेगडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांत्वनपर दिलासा दिला आणि स्व. भेगडे यांच्या कार्याचे स्मरण करत कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.

या भेटीदरम्यान अजित पवार यांनी स्व. भेगडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी स्व. भेगडे यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय योगदान मोठ्या आत्मीयतेने स्मरण केले.

स्व. कृष्णराव भेगडे हे मावळ तालुक्याच्या विकासासाठी झटणारे खरे जनतेचे प्रतिनिधी होते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. या भेटीदरम्यान भेगडे कुटुंबियांनी देखील आपली भावना व्यक्त करत अजित पवार यांच्या सहवेदना व्यक्त केली.



