पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची माहिती पुढे आली असून, 2017 च्या निवडणुकीतील प्रभाग रचना कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने प्रभाग रचना कशी असेल याबाबतची कार्यकर्त्यांमध्ये असलेली उत्सुकता संपली आहे. फक्त प्रभागातील आरक्षणामध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन व राजकीय वर्तुळात मिळत आहे.
महानगरपालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासक राजवट लागू आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जुन्या आरक्षणाला गृहित धरून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार प्रभाग रचना कायम ठेवून निवडणूक घेण्याचा शासन निर्णय आता स्पष्ट झाला आहे.
शहरात एकूण 32 प्रभाग असणार असून प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक निवडून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे एकूण 128 नगरसेवकांची निवड होणार आहे. 2017 मधीलच चार सदस्यीय प्रभाग रचना ठेवण्याचे आदेश असून, त्यानुसार 2025 मधील महापालिका निवडणूक ही देखील त्याच रचनेवर आधारित राहणार आहे.
यामुळे इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांना आता फक्त आरक्षण रचनेवर लक्ष केंद्रित करता येणार असून, प्रभाग सीमांकनातील अनिश्चिततेची अवस्था संपुष्टात आली आहे. येत्या काही दिवसांत आरक्षण जाहीर होणार असून, त्यानंतर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




