पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अर्बन स्ट्रीट प्रकल्पामुळे पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. विशेषतः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील रस्त्यावर दररोज नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावर वाहनचालकांसाठी असलेला जागा अलीकडेच आणि 50% जागेत पार्किंग, सायकल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक आणि रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी वापरात आणली गेली आहे. परिणामी प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी उपयुक्त असलेली रस्त्याची रुंदी घटली असून, वाहतुकीचा मोठा भार या मार्गावर पडत आहे.
विशेष म्हणजे मोरवाडी सिग्नल पास करण्यासाठी वाहनचालकांना तीन ते चार सिग्नल वेळ पार करावा लागत आहे. परिणामी, सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. नागरिकांचा प्रवास वेळ व इंधन दोन्ही वाया जात असून, प्रदूषणातही भर पडत आहे.
ही गंभीर स्थिती लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरातील आमदारांनी चालू पावसाळी अधिवेशनात हा विषय विधीमंडळात उपस्थित केला. आमदारांनी सरकारकडे मागणी केली की, अर्बन स्ट्रीटसारख्या प्रकल्पांची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष वाहतुकीवर होणाऱ्या परिणामाचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जावा.
राज्य सरकारचा काय प्रतिसाद?
या मुद्द्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच शहरी विकास विभागाने सांगितले की, महापालिकेला अशा प्रकल्पांच्या अंमलबजावणीत वाहतूक व्यवस्थापनाची योग्य काटेकोर योजना आखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित रस्त्यांचे रिडिझायनिंग, ट्रॅफिक सिग्नल सिंक्रोनायझेशन आणि पार्किंग व्यवस्थेवरही राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांची अपेक्षा: उपाय लवकर व्हावा
सध्या नागरिक त्रस्त झाले असून, त्यांनी महापालिकेने वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी तत्काळ कृती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. अर्बन स्ट्रीटसारखे प्रकल्प चांगले असले तरी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक मार्ग, अंडरपास किंवा फ्लायओव्हर यावरही विचार होणे गरजेचे आहे.




