पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
पवसाळा जोर धरू लागल्यानंतर पवना धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी साठा तब्बल ७१.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील २४ तासांत ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामुळे धरणाच्या साठ्यात २.३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
१ जूनपासून आतापर्यंत एकूण १०८५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच धरण साठा चांगल्या गतीने वाढत आहे. केवळ एक महिन्याच्या कालावधीत साठ्यात ५१.६७ टक्के वाढ झाली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
तुलनात्मकदृष्ट्या पाहता, गेल्यावर्षी याच तारखेला पवना धरणाचा साठा फक्त १९.०९ टक्के होता. यावर्षीचा पाऊस आणि त्याचा धरण साठ्यावर झालेला सकारात्मक परिणाम लक्षात घेता, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता बळकट झाली आहे.
पवना धरण हे पिंपरी चिंचवड शहराचा मुख्य जलस्रोत असल्याने त्यातील वाढता साठा नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. अजूनही पावसाळा सुरूच आहे, त्यामुळे पुढील काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याचा साठा लक्षात घेऊन शहरात पुरेशा पाण्याचा वापर होईल याची खात्री करण्याचे नियोजन सुरू केले आहे. दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




