पिंपळे सौदागर : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरातील ‘विंड चाईम’ या सोसायटीतील नागरिकांनी पर्यावरण संरक्षणाचा स्तुत्य निर्णय घेत सोसायटीमध्ये नवीन सोलर सिस्टीमची स्थापना केली आहे. या सौरऊर्जेच्या प्रकल्पाचे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रवीण मंत्री, सेक्रेटरी, विविध समित्यांचे सदस्य, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि सोसायटीमधील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोलर प्रकल्पामुळे सोसायटीची विजेवरील अवलंबनता कमी होणार असून पर्यावरण रक्षणातही मोलाची भर पडणार आहे.
नाना काटे यांनी सोसायटीच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “शाश्वत ऊर्जा वापरण्याची ही काळाची गरज आहे. अशा निर्णयांमुळे पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ व हरित भविष्य घडेल.”
सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले की, या सोलर सिस्टीममुळे दर महिन्याच्या वीजबिलामध्ये लक्षणीय बचत होणार आहे आणि त्यामुळे भविष्यातील देखभाल खर्चही कमी होईल. सोसायटीच्या या पावलाचे परिसरातूनही कौतुक होत आहे.




