हिंजवडी: आज पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रो मार्गिका – ३ तसेच परिसरातील विविध विकासकामांची आणि स्थानिक समस्यांची पाहणी केली.

या दौऱ्यात त्यांनी पुणे मेट्रो मार्गिका – ३ वरील स्थानक क्र. ०६ क्रोमा, स्थानक क्र. ०३ व ०२, हेलिपॅड सर्कल, माण रोड, माण गाव, लक्ष्मी चौक तसेच संपूर्ण हिंजवडी परिसरातील कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. पावसाळ्यामुळे निर्माण होणारे पाणी साचण्याचे प्रश्न, रस्त्यांची दयनीय अवस्था, वाढती वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांचा अभाव यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी सखोल चर्चा केली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यात स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, महा-मेट्रोचे अधिकारी आणि बांधकाम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी प्रलंबित विकासकामांबाबत वेळेत आणि दर्जेदार काम करण्याचा आदेश दिला. राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटीबद्ध असून, मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून पुणे आणि परिसरातील वाहतुकीला दिलासा मिळणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.




