पिंपळे सौदागर | नाना काटे सोशल फाउंडेशन व उमेश काटे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे “संतवाणी – दासवाणी” या अध्यात्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. संतवाणी – दासवाणी भक्तिरसात न्हालेलं संगीतमय सादरीकरण करण्यात आले. पं. भीमसेन जोशी यांची गायकी ज्यांच्या सुरांमध्ये साक्षात अनुभवता येते, असे विख्यात शिष्य पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या स्वरांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. स्वरांची सुरेल मैफल आणि संतांच्या विचारांनी नटलेल्या या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांना अध्यात्मिक अनुभूतीचा विलक्षण अनुभव मिळाला. कार्यक्रमामध्ये विविध संतांच्या वाणीवर आधारित भक्तिगीते, अभंग आणि भावगीते सादर करण्यात आली. भावपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, युवा नेते उमेश काटे यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. संतवाणीच्या माध्यमातून अध्यात्माची नाळ अधिक घट्ट करणारा एक प्रेरणादायी असा उपक्रम ठरला.