२० जुलै रोजी आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीस मुक्कामी येणार
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आषाढी एकादशीचा भाविक वातावरणात उत्सव पार पडल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या आता परतीच्या प्रवासावर निघाल्या आहेत. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात विशेष बदल करण्यात आले असून, पुणे शहरातील दोन मुक्काम कमी करून फक्त एकच मुक्काम ठेवण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी गावातील मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी मोरवाडी चौक – केएसबी चौक(टेल्को चौक) – भोसरी गाव – मॅगझिन चौक मार्गे देवाच्या आळंदीस मुक्कामी जाणार आहे.
- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य
यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष आणि संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठगमन वर्ष असून, या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून संत तुकाराम महाराज संस्थान व मोरे वंशज मंडळींनी आळंदी मुक्कामास सहर्ष संमती दिली आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबाबत माहिती देताना संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त जालिंदर मोरे महाराज म्हणाले, “संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विनंतीनुसार आम्ही यंदा आषाढ वद्य दशमी, रविवार, दि. २० जुलै २०२७ रोजी पालखीसह आळंदीत मुक्कामी येत आहोत. हा क्षण संपूर्ण मोरे वंशासाठी अभिमानास्पद व ऐतिहासिक ठरणार आहे.
१६८७ च्या परंपरेला उजाळा
सन १६८७ मध्ये तपोनिधी नारायण महाराज, संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव, यांनी पालखी सोहळ्याची परंपरा सुरू केली होती. त्याकाळी पालखी जाताना व येताना दोन्ही वेळा श्री क्षेत्र आळंदी मार्गे जात असे. यंदाचा आळंदी मुक्काम हीच परंपरा पुन्हा उजळवणारा ठरणार आहे.
भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
या ऐतिहासिक भेटीमुळे वारकरी संप्रदाय व दोन्ही संस्थानांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आळंदी मुक्कामी येण्याची तयारी करत आहेत. या ऐतिहासिक भेटीमुळे संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समरसतेचा व भक्तीच्या परंपरेचा नवा अध्याय घडणार आहे, अशी भावना समस्त वारकरी संप्रदायात व्यक्त केली जात आहे.




