पिंपरी : लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकार समुदायासाठी पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र “पत्रकार भवन” साकारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन, हा प्रस्ताव आगामी विकास आराखड्यात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात दिपक खैरनार यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत पुणे शहरात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उपलब्ध आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात अशा कोणत्याही समर्पित व एकात्मिक सुविधा उपलब्ध नाहीत. हे शहर झपाट्याने विकसित होत असून, येथील पत्रकारांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे.
अशा परिस्थितीत, पत्रकारांसाठी नियोजनबद्ध सभांसाठी, चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा, पत्रकार परिषदा तसेच सांस्कृतिक उपक्रम आयोजनासाठी स्वतंत्र आणि आधुनिक सोयींनी युक्त भवनाची आवश्यकता प्रकर्षाने जाणवते. “पत्रकार हे समाजातील विविध घडामोडी जनतेसमोर आणत असतात. त्यांच्या कार्यासाठी आवश्यक भौतिक सुविधांचा अभाव असणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे, पिंपरी-चिंचवडसारख्या प्रगत शहरात ‘पत्रकार भवन’ची निर्मिती ही काळाची गरज आहे. महानगरपालिकेच्या पुढील विकास आराखड्यात या प्रस्तावाचा समावेश करून पत्रकार बांधवांना एक व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे असल्याची मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.




