पिंपरी-चिंचवड | १६ जुलै २०२५
चिंचवडचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगर रचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्याशी थेट भेट घेऊन पुनावळे परिसरातील रहिवाशांनी मोठा सामाजिक मुद्दा मांडला आहे. प्रस्तावित आरक्षण क्रमांक 7/95 (SACC and Conventional Centre) रद्द करून त्या जागी ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याची मागणी केली आहे.
65 हाउसिंग सोसायट्यांची एकमुखी हरकत
पुनावळे परिसरातील एकूण 65 हाउसिंग सोसायट्यांचे अध्यक्ष, समिती सदस्य आणि रहिवासी नागरिकांनी सामूहिकरित्या हरकत पत्र महापालिकेला दिले. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, परिसरातील लोकसंख्या आणि प्रदूषण वाढत असताना SACC सेंटरपेक्षा नागरिकांसाठी हरित क्षेत्र, ऑक्सिजन निर्मिती आणि सार्वजनिक आरोग्याला पूरक ठरणारा ऑक्सिजन पार्क अधिक गरजेचा आहे.
हरकत पत्र आणि नागरिकांच्या सह्या सादर
निवेदनामध्ये प्रत्येक सोसायटीच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आणि पाठिंब्याचे दस्तऐवज महापालिकेला सुपूर्द करण्यात आले. यामध्ये पुढील प्रमुख सोसायट्यांचा समावेश आहे:
सिद्धशिला ईला, सोमानी रेसिडेन्सी, माय होम, गोल्डन ट्रेझर, सेंटोसा प्राइड, सूर्या स्काईज, 18 अक्षांश, जीके आरकॉन, एडियमविल, लेगसी आयव्ही, गायकवाड मिरो, स्मृती गार्डन, भालचंद्र उपवन, मालपाणी सेरेझा, इन्फिनिटी वर्ल्ड, सारा मेट्रोव्हिल, प्लुमेरिया ड्राइव्ह विंग (अ ते ग), सिरोको ग्रँड, इन्फिनिटी टॉवर, श्रेयांश अपार्टमेंट, ४५ शाश्वत एव्हन्यू, सिद्धशिला मधुबन, श्रीशा प्राइड आदी 65 सोसायट्या.
‘ऑक्सिजन पार्क’साठी नागरिकांची एकजूट
या संपूर्ण उपक्रमामागे स्थानिक नागरिकांची पर्यावरणविषयक जागरूकता आणि भविष्याचा विचार आहे. महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित SACC आरक्षण रद्द करून, त्या ठिकाणी हरित, खुला आणि सर्व वयोगटासाठी उपयुक्त ऑक्सिजन पार्क उभारण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या हरकतीनंतर महापालिकेने सकारात्मक विचार करावा आणि लवकरच आरक्षण बदलाचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “या मागणीचा आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत, आणि पर्यावरणपूरक निर्णय झाल्याशिवाय थांबणार नाही,” असा निर्धारही नागरिकांनी केला आहे.
ही कारवाई केवळ विकासविरोधी नव्हे, तर संतुलित विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. प्रशासनाकडून लवकर सकारात्मक प्रतिसाद मिळावा, ही पुनावळेकरांची अपेक्षा आहे.




