मुंबई : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, वाढते अपघात आणि नागरिकांच्या हालाखीच्या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शन करण्यात आले. या आंदोलनात आमदार बाबाजी काळे (खेड) व माऊली कटके (शिरूर) यांनीही सहभाग घेत तातडीच्या डागडुजीची मागणी केली.
संबंधित रस्त्यांसाठी सुमारे ₹ ३२०० कोटींच्या निविदा प्रक्रियेचा प्रारंभ झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्यासाठी किमान ३-४ महिने व पूर्ण कामासाठी २ ते २.५ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे खड्डे बुजवणे, साईडपट्ट्यांचे मुरमीकरण करणे, तसेच अपघातप्रवण भागांवर सूचना फलक लावणे यासारखी तातडीची कामे त्वरित सुरू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
प्रत्येक दिवशी हजारो कामगार, विद्यार्थी व शेतकरी या रस्त्यांवरून प्रवास करतात. अपुऱ्या देखरेखीमुळे अपघात वारंवार घडत असून जबाबदारी झटकली जात आहे. केवळ मोठ्या टेंडर प्रक्रियेचा हवाला देणे ही जनतेच्या सुरक्षेशी होणारी थट्टा असल्याची ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
खेड आळंदी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की, या मार्गावर गेल्या वर्षभरात १५० पेक्षा जास्त अपघात झाले असून नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके यांनी या रस्त्याचे औद्योगिक व वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करत, रिंगरोड आणि पर्यायी महामार्गांची गरजही स्पष्ट केली.
हे रस्ते मोठ्या औद्योगिक क्षेत्रांना जोडणारे असून, कामगार व शेतकरीवर्गाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. शासन यास किती गांभीर्याने घेते व पुढील कृती काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




