तळेगाव दाभाडे | १६ जुलै — चाकण येथील खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जात असलेली बस आणि एसटी बस यांच्यात बुधवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. हा अपघात सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास देहूफाटा येथे घडला. या घटनेत खाजगी बसमधील ११ जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील एका खासगी कंपनीतील कामगारांना घेऊन बस जात असताना देहूफाट्याजवळ परळ डेपोच्या एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत खाजगी बसमधील एकूण ११ कर्मचारी जखमी झाले.
जखमींपैकी सहा जणांना अथर्व हॉस्पिटल, पाच जणांना संत तुकाराम महाराज हॉस्पिटल (देहू) तर एकाला जनरल हॉस्पिटल, तळेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
प्राथमिक तपासात, बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याचे उघड झाले आहे. मात्र याबाबत अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत. एसटी बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
आज मुंबई येथे पावसाळी अधिवेशना दरम्यान तळेगाव चाकण शिरूर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात मावळचे आमदार सुनील शेळके, खेडचे आमदार बाबाजी शेळके व शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी निदर्शने केली. त्यातच या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी वेळीच पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघातामुळे पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चालकांच्या दक्षतेची गरज अधोरेखित झाली आहे.




