चिखली : प्रभाग क्रमांक 11, कृष्णा नगरमधील स्पाईन रोडवरील धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्या सौ. कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा निषेध म्हणून या खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण करण्यात आले.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यासाठी महापालिका प्रशासन यांच्याकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. खोलवर झालेल्या खड्ड्यामुळे रस्त्यावरती वाहतूक करणारे वाहन चालक, पादचारी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, “कधीही अपघात होईल” अशी भीती मनात आहे.
मानवी हित लक्षात घेता पालिका प्रशासनाने सामान्य नागरिकांनी दिलासा द्यावा. प्रशासनाकडे खड्डे बुजवून रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच, भविष्यात खड्डे पडू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



