मुंबई | विधानभवनाच्या आवारात आज मोठा गोंधळ उडाला, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. या वादाचे पर्यवसान त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत झाले.
दरम्यान दोन्ही आमदारांमध्ये एका सामाजिक विषयावर चर्चा सुरू असताना वाद अधिकच तीव्र झाला. त्यानंतर दोघांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि जोरदार झटापट झाली. काही कार्यकर्त्यांचे शर्ट फाटले, काही जण किरकोळ जखमी झाले असून सुरक्षारक्षकांनी मोठ्या अडचणीने परिस्थिती नियंत्रणात आणली.
विधानभवनाच्या परिसरात अशा प्रकारची धक्कादायक घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या वादावर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आपली भूमिका मांडली. या घटनेमुळे विधीमंडळाच्या शिस्तबद्धतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.



