
पुणे : हिंजवडीसह परिसरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने हिंजवडी परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. या भागातील अतिक्रमणासंदर्भात सर्वेक्षण सुरू असून, संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत माण गावातील गट क्रमांक १६६ मधील ओढे-नाल्याभोवती असलेल्या २८ बांधकामांचे अतिक्रमण काढण्यात आले.
यासह विप्रो सर्कल परिसरातील माऊली हॉटेलवरचे अतिक्रमणही काढण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली. पीएमआरडीए, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाबरोबरच (एमआयडीसी) अन्य शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पीएमआरडीएच्या हद्दीतील राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) धडक मोहीम राबविण्यात आली होती. महिनाभर चालेल्या या मोहिमेमध्ये अनधिकृत बांधकामे, विविध प्रकारची अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. यात प्रामुख्याने वर्दळ असणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यावर भर देण्यात आला होता.महामार्ग कोंडीमुक्त करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती.