
या सगळ्या प्रकरणानंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांच्या ज्या कार्यकर्त्याने मार खाल्ला त्याच नितीन देशमुखला अटक केली. या अटकेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार दोघेही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले. याठिकाणी रोहित पवार आणि तेथील पोलिस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसले. पोलिस ठाण्यात एक पोलिस अधिकारी रोहित पवार यांच्याशी हातवारे करून बोलत होता. ही बाब रोहित पवारांना खटकली. यानंतर रोहित पवार संतापल्याचे दिसले.
“हातवारे करू नका…आवाज खाली करा…शहाणपणा करू नका…बोलता येत नसेल तर बोलू नका, कळलं का?” अशा शब्दात रोहित पवारांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला झापले. या वेळी रोहित पवारांचे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यावेळी पोलिसांनी कारवाई करण्याचे संकेत दिले. तेव्हा रोहित पवारांचा कार्यकर्ते चवथाळले आणि साहेबांना हात लावायचा नाही, अशा भाषेत इशारा दिला. हा सर्व राडा सुरू असताना आमदार जितेंद्र आव्हाडदेखील घटनास्थळी होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांसह काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलीस ठाण्यातला तणाव निवळला. पण या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.