पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक : प्रभाग १०
पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम जोरदार रंगताना दिसत असताना प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर–शाहूनगर–मोरवाडी–दत्तनगर) येथे मात्र निवडणुकीची धामधूम अपेक्षेइतकी जाणवत नाही. इतर प्रभागात ढोल-ताशे, एलईडी व्हॅन, रिक्षा वरती वाजणारी गाणी, फ्लेक्स, बॅनर्स आणि आक्रमक प्रचार मोहिमा दिसत असताना प्रभाग १० मध्ये शांततेचा माहोल असल्याची चर्चा शहरात आहे.
या शांततेमागे महत्त्वाचे कारण म्हणजे या प्रभागातील निवडणुकीचे राजकीय चित्र. सुप्रिया चांदगुडे या प्रभागातून बिनविरोध निवडून आल्याने स्थानिक पातळीवरील मोठा राजकीय संघर्ष टळला आहे. तर भाजपच्या पॅनलमध्ये आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे, माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र गौरव कदम आणि माजी नगरसेवक तुषार हिंगे असे सक्षम आणि वजनदार चेहरे रिंगणात असल्याने विरोधकांकडून तितक्या ताकदीचे पॅनल उभे राहिले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याच कारणामुळे शहरातील इतर भागाप्रमाणे या प्रभागात जोरदार स्पीकरबाजी, फटाकेबाजी, फ्लेक्सबाजी आणि मोठमोठ्या सभांची धामधूम दिसून येत नाही. निवडणुकीचा ताण आणि टक्कर नसल्याने येथील निवडणूक वातावरण ‘शांत’ आणि ‘संयमी’ राहिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
एकूणच, ज्या काळात शहरातील इतर प्रभागात निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे, त्याच वेळी प्रभाग क्रमांक १० मात्र महिलांना जेष्ठांना व लहान मुलांना आणि शाळकरी मुलांना शांतता मिळत आहे. येथील राजकीय समीकरणे जवळपास ठरलेली असल्याची भावना नागरिक आणि राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.




