पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार, निविदेतील रिंग, रस्ते कामात गैाकार, श्वान नसबंदीत घोटाळे, लाच प्रकरणात स्थायी समिती सभापतीची अटक आणि सिनेस्टाइल कोयता गँगचे हल्ले, असे बरेच काही पिंपरी चिंचवडमध्ये झाले. मात्र, त्यावर ‘मी काहीही बोलत नाही’, असा खोचक सूर लावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. ९) महापालिकेतील भाजपच्या तत्कालीन सत्ताधारी स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांची किवळेतील मुकाई चौकात सभा आयोजित केली होती. मात्र, मुंबईत आयोजित चार सभांमुळे किवळेतील सभेला उपस्थित राहू शकत नसल्याबाबत दिलगिरी व्यक्त करत त्यांनी मोबाईल व्हिडिओ कॉलींगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. तत्पूर्वी शिवसेना नेते उदय सामंत यांनी सभेला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “लाडक्या बहिणींनी मतपेटीत शिवसेनेला एकनाथ शिंदे पहिला क्रमांक दिला. त्यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. इतिहास टक्कर देणाऱ्यांचाच लिहिला जातो, तडजोड करणाऱ्यांचा नाही. त्यामुळे कोणालाही घाबरू नका आणि बिनधास्त लढा. गेल्या तीन वर्षांपासून माझ्यावर सातत्याने टीका होत आहे. शिव्याशाप दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्हीही संयम ठेवा. हाल होतील, पण हार होणार नाही. सत्याला त्रास होतो, पण सत्य कधीही पराभूत होत नाही. शिवसेना स्वबळावर लढत असून तिला कोणीही हलक्यात घेऊ नये.”
शिवसेना ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असणार
एकनाथ शिंदे म्हणाले, “पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भगव्या विचारांचे वादळ निर्माण झाले आहे. या भूमीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आल्याशिवाय राहणार नाही. ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यांच्या विचारांशी तडजोड होणार नाही. एकदा शिवसेनेच्या हाती सत्ता देऊन दाखवा, विकासाचे कुलूप उघडून दाखवतो. आम्ही सत्तेत आल्यानंतर शास्ती कर आणि त्यावरील दंड माफ केला, बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा दिला. मला काय मिळाले? यापेक्षा लोकांना काय दिले?, हे महत्त्वाचे आहे. आम्ही शब्द देऊन थांबत नाही, तर तो पाळतोही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म नक्कीच झाला आहे. तीन वर्षांत ३६५ कोटी लाडक्या बहिणींसाठी दिले, पुढे ही निधी कमी पडू देणार नाही.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
- तलाव व सरोवरांचे पुनरुज्जीवन करणार
- सांडपाणी निचऱ्यासाठी ५२ कोटींचा निधी दिला
- पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १५३ कोटींची योजना मंजूर
- पवना बंद जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू करणार
- पवना-मुळा-इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणार
- समाविष्ट भागातील अर्धवट डीपी रस्ते पूर्ण करणार
- चुकीचा डीपी दुरुस्त केला जाईल
- वाकड-हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविणार
- आरोग्य केंद्र उभारण्यात येणार
- चापेकर स्मारकासाठी ६८ कोटींचा निधी मंजूर असून १३ कोटी वर्ग




