मुंबई, 02 एप्रिल : आज हिंदू नववर्षाला (Hindu New Year) चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून अर्थात गुढीपाडव्यापासून (Gudi Padwa 2022) प्रारंभ होत आहे. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतातल्या पंचांगानुसार या दिवशी चैत्री नवरात्रोत्सवदेखील सुरू होत आहे. यंदा हिंदू नववर्ष संवत् 2079 च्या सुरुवातीलाच ग्रहांचे दुर्मिळ योग आहेत. हे योग सुमारे दीड हजार वर्षांनंतर जुळून आले आहेत. या योगांचा परिणाम सर्वसामान्य व्यक्तींपासून ते देशाच्या एकूण व्यवस्थेवर दिसून येणार आहे, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे.
यंदा हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला ग्रह (Planets), नक्षत्रांची स्थिती वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ अशी असणार आहे. ग्रहांचे असे शुभ योग सुमारे 1500 वर्षांनंतर येत आहेत. यापूर्वी असा दुर्मिळ योग 22 मार्च 459 रोजी आला होता, अशी माहिती ज्योतिष अभ्यासकांनी दिली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला रेवती नक्षत्र आणि 3 राजयोग येत आहेत. याशिवाय नव्या वर्षाच्या प्रारंभी मंगळ (Mars) हा मकर (Capricorn) या त्याच्या उच्च राशीत असेल. राहू-केतू त्यांच्या वृषभ (Taurus) आणि वृश्चिक (Scorpio) या उच्च राशींमध्ये असतील. शनी स्वतःच्या मकर राशीत असेल. त्यामुळे हिंदू नववर्षाच्या कुंडलीत शनी-मंगळ युती हा शुभ योग तयार होत आहे, असं ज्योतिष अभ्यासकांनी सांगितलं