मुंबईत सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. “मुंबईचं प्रेम सगळ्यांना आहे, ते बोलायला नको. ते प्रेम कामात दिसलं पाहिजे. तुमचं मुंबईवर प्रेम असेल, मुंबईकरांवर प्रेम असेल तर बुलेट ट्रेनला कांजूरची ओसाड जमीन का देत नाहीत?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबईचं प्रेम सगळ्यांना आहे. ते बोलायला नको, पण कामात प्रेम दिसलं पाहिजे. मी म्हणतो मेट्रोच काय पण आणखी काही कामं केली असतील तर सगळ्यांचं श्रेय जे जे ओरडतायेत त्यांना देऊन टाकायला मी तयार आहे. तुम्ही मेट्रोवरील प्रेम दाखवत आहात, मात्र बुलेट ट्रेनचा आग्रह सुरू आहे. अजित पवार आणि आम्ही सगळे चर्चा करतो, मुंबईची लाख मोलाची जमीन जिथे आम्ही आर्थिक केंद्र करत होतो ती जागा यांनी बुलेट ट्रेनसाठी घेतली. या बुलेट ट्रेनचा मुंबईकरांना उपयोग काय?
सध्या होऊ घातलेली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई होणार आहे. त्याचा मुंबईकरांना काय उपयोग आहे? तुमचं मुंबईवर प्रेम असेल, मुंबईकरांवर प्रेम असेल तर कांजूरची ओसाड पडलेली जमीन बुलेट ट्रेनला का देत नाहीत? ती जमीन बुलेट ट्रेनला दिली तर लाखो कोट्यावधी वाचतील. ती जागा आम्हाला द्या. आपण बदलापूर अंबरनाथपर्यंत जाऊ शकतो. ती जाण्याची वेळ एकदिवस येणार आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.